स्टायलिश सोनी वायो इ१४ए


                                   शाळा, महाविद्यालयांमध्ये असणारे विद्यार्थी आणि शिवाय कॉर्पोरेट कंपन्या व तत्सम काम करणाऱ्यांसाठी लॅपटॉप ही आता गरज झाली आहे. खरेतर गेल्या वर्षांपासूनच बाजारात येऊ लागलेली अल्ट्राबुक्स ही त्यावरचा अतिशय चांगला उपाय आहेत. कारण ही सर्वच अल्ट्राबुक्स दिसायला देखणी, काम करण्यासाठी उत्कृष्ट क्षमतेची तर आहेतच, पण त्याचे वजनही कमीत कमी आहे. त्यामुळे त्याची ने-आण करणे खूप सोपे जाते. 
विद्यार्थी असो किंवा मग कॉर्पोरेट जगतातील कर्मचारी सर्वासाठीच लॅपटॉपची ने-आण हा महत्त्वाचा विषय आहे. त्यातही आता प्रत्येकाला आपापल्या आवडीनिवडी जपायच्या असतात. तरुणांमध्ये तर हे प्रमाण मोठे आहे. हे सर्वात पहिले ओळखले ते सोनी या कंपनीने. त्यांनी त्यांची वायो मालिका बाजारात आणतानाच विविध रंगांचे अनेक पर्याय ग्राहकांसमोर, खास करून तरुणांसमोर ठेवले. आणि त्यामुळे तरुण वर्गात सोनी लगेचच लोकप्रिय झाली.
 नंतर हाच फंडा त्यांनी गृहिणींसाठी आणि गेमिंग किंवा इतर क्षेत्रांतील ग्राहकांसाठी वापरला. त्यामध्येही त्यांना चांगले यश आले. सोनीला आता आपला ग्राहक वर्ग नेमका लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांनी त्या दिशेने आणखी पुढची पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
आता सोनीने ई मालिकेमध्ये ई१४ ए हे नवे मॉडेल बाजारात आणले असून अलीकडेच ते 'लोकसत्ता- टेक इट'कडे रिव्ह्यूसाठी पाठविण्यात आले होते. 'रॅप अराऊंड' हे या मॉडेल्सचे खास वैशिष्टय़ आहे. म्हणजेच त्याच्या देखणेपणाकडे कंपनीने विशेष लक्ष दिले आहे. तरुण-तरुणींना केवळ लॅपटॉप आहे हे सांगण्यापेक्षा तो दाखविण्यामध्ये किंवा तो मिरविण्यामध्ये अधिक स्वारस्य असते. नेमके हेच हेरून सोनीने हे नवीन लॅपटॉप्स बाजारात आणले आहेत. किंबहुना म्हणूनच तरुणांची आयकॉन असलेली करिना कपूर हिला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे. तरुणाईला आकर्षित करणे हाच त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

लॅपटॉपचा बाह्यरंग काळा असला तरी त्याला लाल रंगाची किनार अशी याची रचना आहे. ही किनार केवळ बाह्यरूपालाच नव्हे तर अनेक ठिकाणी पाहायला मिळते आणि ती लॅपटॉपचे सौेंदर्य निश्चितच खुलवते. केवळ एवढेच नव्हे तर लॅपटॉपच्या रंगरूपाला साजेशा अशा अ‍ॅक्सेसरीज अर्थात त्याला जोड अशी उपकरणेही कंपनीने बाजारात आणली आहेत. त्यात की पॅड कव्हर, माऊस आदींचा समावेश आहे.

या लॅपटॉपचा कीबोर्ड वापरकर्त्यांसाठी चांगल्या पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. यापूर्वीच्या काही मॉडेल्समध्ये टचपॅडवरून काम करताना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्याचा उल्लेख यापूर्वीच्या रिव्ह्यूमध्ये करण्यात आला होता. मात्र आता या नव्या मॉडेलमध्ये त्या त्रुटी टाळण्यात सोनीला यश आले आहे.
 कमी जाडीचा लॅपटॉप याचबरोबर एचडी कॅमेरा हेही त्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. बॅकलिट कीबोर्डसारख्या केवळ दिखाऊपणाबरोबरच कंपनीने बॅटरीची क्षमता वाढविण्यासारखे चांगले कामही केले आहे. लॅपटॉपचा वापर करताना त्याच्या बॅटरीचे आयुष्यमान आणि क्षमता सर्वाधिक महत्त्वाच्या घटकांमध्ये मोडते.

या लॅपटॉपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे आवाजाची अतिशय उत्तम असलेली गुणवत्ता. या लॅपटॉपवर गाणी ऐकणे किंवा चित्रपट पाहणे हा खरोखरच चांगला असा आनंददायी अनुभव आहे. आवाजाच्या बाबतीत आजवर जगभरात सोनीने त्यांची गुणवत्ता सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये कायम राखली आहे. त्याची उंचावलेली पातळी या लॅपटॉपच्या निमित्ताने अनुभवता येते. होम थिएटर अनुभव या चांगल्या आवाजाच्या पातळीमध्ये सामावलेला आहे.
सध्या 'ऑन गो' हा परवलीचा शब्द असून त्यामुळेच हलके असलेले किंवा कमी वजन हा महत्त्वाचा भाग ठरतो. या लॅपटॉपचे वजन अडीच किलो एवढेच आहे. अर्थात अल्ट्राबुक हे त्यापेक्षाही खूपच कमी वजनाचे असले तरी तरुणाईला अडीच किलो वजन सोबत न्यायला फारशी तक्रार नसते. त्यांचे सारे लक्ष हे लॅपटॉपमधून मिळणाऱ्या अनुभवावर एकवटलेले असते. हे लक्षात घेतले तर हा लॅपटॉप तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरू शकतो, हेही लक्षात येईल.
उर्वरित महत्त्वाच्या बाबी सोबतच्या चौकटीत देण्यात आल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ५५,९९९ /-
सोनी वायो ई सीरीज लॅपटॉप इ१४ए
मॉडेल क्रमांक     - एसव्ही इ १४ ए १५ एफएन/ बी
सीपीयू    - सेकंड जनरेशन इंटेल कोअर  आय५-२४५०एम प्रोसेसर २.५० गिगाहर्ट्झ  (थ्री एम कॅश, ३.१० गिगाहर्ट्झपर्यंत )
ऑपरेटिंग सिस्टीम -जेन्युइन विंडोज ७ होम प्रीमियम
ग्राफिक्स - एचडी ७६७०एम (१जीबी)
डिस्प्ले    - १४ (३५.५६ सें.मी.) रुंद  डब्लूएक्सजीए++ १६०० ७ ९००
रॅम - ४ जीबी डीडीआर३, एसडीआरएएम
साठवणूक - एचडीडी ६४० जीबी
ऑप्टिकल ड्राइव्ह - डीव्हीडी सुपर मल्ट्रिडाइव्ह
वायरलेस - इंटिग्रेटेड वायरलेस लॅन आयईईई  ८०२.११ बी/ जीएन
बॅटरीची क्षमता    - ५.५ तास
वॉरंटी    - एक वर्षांची आंतरराष्ट्रीय वॉरंटी
वजन    - २.३० किलोग्रॅम्स
उपलब्ध रंग -    काळा, पांढरा, गुलाबी
किंमत     - रु. ५५,९९०/-





Loksatta
स्टायलिश सोनी वायो इ१४ए स्टायलिश सोनी वायो इ१४ए Reviewed by Sooraj Bagal on November 21, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.