आधारचा UIDAI फोन क्रमांक आपोआप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये येण्यामागचं सत्य...!

गेले काही दिवस अचानक सगळीकडे एक संदेश पसरताना दिसत आहे की 'धक्कादायक आपल्या मोबाईलची काॅण्टॅक्ट लिस्ट तपासा आज 1800-300-1947 हा UIDAI (आधारसंबधित) क्रमांक आपोआप सेव्ह झालेला आढळेल, हा नंबर आधारशी संबंधित नाही. आपल्या फोन मधील सर्व माहिती थर्ड पार्टीला या नंबरवरून प्राप्त होते. तो  नंबर डिलीट करा.. मी चेक केला अन डिलीट केला..' 

वरील संदेश पूर्ण खोटा असून हा क्रमांक फोनमध्ये आल्याने कोणताही धोका वगैरे होत नाही. मग हा मेसेज पसरायला सुरुवात कशामुळे झाली ? तर हा पण घोळ आधार नियंत्रित करणाऱ्या UIDAI संस्थेनेच घातला आहे.
आपण कोणताही फोन खरेदी करून तो पहिल्यांदा स्विच ऑन करतो त्यावेळी आपल्या फोन मध्ये काही क्रमांक आपोआप येतात जसे पोलिसांचा १००, अग्निशमन दलाचा १०१ हे आधी पासूनच सेव्ह केलेले क्रमांक आपण पाहिलं असतील. तशाच प्रकारे हा आधारचा क्रमांक १८००-३००-१९४७ UIDAI या नावाने सेव्ह केला गेला असण्याची शक्यता आहे.
आता प्रश्न पडला असेल की शक्यता आहे तर खात्रीच काय ? शक्यता यासाठी म्हणत आहोत की UIDAI ने आज सकाळी ट्विट्स करून स्पष्टीकरण दिलं आहे की सध्या हा क्रमांक अधिकृत नाही तर १९४७ हा आहे!
मात्र आपण आपल्यापैकी काही जणांच्या आधार कार्डवर मदत क्रमांक म्हणून १८००-३००-१९४७ छापलेला पाहू शकतो याचा अर्थ तो क्रमांक अधिकृत नक्कीच होता. आधारच्या वेबसाइटवर सुद्धा हा क्रमांक होता.
UIDAI च्या अधिकृत ट्विट्स
त्यामुळेच  १८००-३००-१९४७ आधार फोन क्रमांक फोनवर जोडण्यासाठी UIDAI कडूनच सुचवलं गेलं असणार आहे. मात्र आता UIDAI याबाबत हा क्रमांक खोटा असून आम्ही कुठल्याही कंपनीला असा क्रमांक फोन्समध्ये जोडण्यास सांगितलेलंच नाही असा दावा करत आहे! अलीकडे आधारमधील सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न समोर येत असताना आणखी वाद नको या उद्देशाने बहुधा UIDAI माघार घेत असेल. त्यांनी कुठल्याही फोन निर्मात्या कंपनीला किंवा टेलिकॉम कंपन्यांना असा आदेश दिला नसल्याचंसुद्धा सांगितलं आहे!
काल फ्रेंच हॅकर एलिएट अल्डरसन (खरं नाव रॉबर्ट बाप्टीस्ट) याने पुन्हा आधारच्या त्रुटींकडे लक्ष वेधण्यात पुढाकार घेतला.

प्रश्न : हा क्रमांक फोनमध्ये असल्याने धोका आहे का ?
उत्तर : नाही. केवळ तो क्रमांक फोनमध्ये आहे म्हणून तुमची माहिती कोणाला जाते वगैरे निव्वळ अफवा आहेत. मात्र तरीही आता (UIDAI सांगत आहे म्हणून) हा त्यांचा अधिकृत क्रमांक नाही. त्यामुळे हा क्रमांक फोनमध्ये असला काय आणि नसला काय काही फरक पडत नाही.
तुम्ही तो नक्कीच डिलीट करू शकता. पण ठेवला म्हणून काही नुकसान होणार नाही. यावरून उगाच  व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज फॉरवर्ड करू नका. 
१८००-३००-१९४७ हा आधारचा जुना मदत केंद्र क्रमांक आहे! 
मात्र परवानगी किंवा आधी माहिती न देता अक्षरशः जवळपास सर्वांच्या फोन्सवर चुकीचा क्रमांक जोडला जाईपर्यंत एखादी सरकारी संस्था शांत कशी राहू शकते हा मोठा प्रश्न आहे. आता UIDAI ने काही लोकांनी हितसंबंध जपावे म्हणून (वाईट उद्देशाने ) हा क्रमांक जोडला असेल असं हास्यास्पद विधान केलं आहे! इतक्या मोठ्या प्रमाणावर एखादा चुकीचा क्रमांक कसा काय सेव्ह केला जाऊ शकतो? दरम्यान UIDAI ने त्यांच्या वेबसाइटवर नवा १९४७ क्रमांक लिहून अपडेट केलं आहे.     
आता UIDAI चा अधिकृत मदत क्रमांक १९४७ हाच आहे.
१८००-३००-१९४७ हा UIDAI/आधारचा जुना मदत केंद्र क्रमांक आहे जो आता वापरात नाही!
दरम्यान गूगलने सुद्धा त्यांच्या अँड्रॉइड फोन्समध्ये हा क्रमांक का जोडण्यात आला याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण दिल्याचं माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. हा क्रमांक २०१४ मध्ये अधिकृत UIDAI मदत क्रमांक होता म्हणून आदेशानुसार १८००-३००-१९४७ आणि ११२ (डिस्ट्रेस क्रमांक) हे दोन क्रमांक जोडण्यात आले होते असं गूगलने सांगितलं आहे. हे क्रमांक नंतर अकाउंटसोबत sync होत असल्यामुळे हा क्रमांक आता दिसत आहे असं गूगलने स्पष्ट केलं आहे. मात्र आयफोन ग्राहकांच्या सुद्धा फोनमध्ये हा क्रमांक आढळला आहेच! तसे स्क्रिनशॉटसुद्धा अनेक जण शेअर करत आहेत! त्यामुळे त्या वेळीच टेलिकॉम कंपन्यांनासुद्धा तसे आदेश दिले गेले असावेत!  

search terms : UIDAI helpline phone number issue           
आधारचा UIDAI फोन क्रमांक आपोआप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये येण्यामागचं सत्य...! आधारचा UIDAI फोन क्रमांक आपोआप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये येण्यामागचं सत्य...!  Reviewed by Sooraj Bagal on August 04, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.