आला पावसाळा गॅजेट सांभाळा

रिमझिम पावसात लोकलच्या दारात उभं राहून हेडफोनवर गाणी ऐकण्यासारखं सुख नाही. पण या कल्पनेचा विचका तेव्हा होतो जेव्हा आपला एमपीथ्री किंवा मोबाइलही आपल्यासारखाच चिंब भिजलाय हे कळतं. मग मात्र तो रोमँटिक पाऊस एकदम कंटाळवाणा होऊन जातो. पण काळजी करु नका. अशाच भुलक्कड भाईंसाठी टेक्नोटीमने दिल्यात काही खास टिप्स... 


लॅपटॉप असो मोबाइल किंवा महागडा कॅमेरा जर ते भिजलं तर पहिली गोष्ट करा की तुमचं गॅजेट बंद करा. त्यामुळे विद्युत प्रवाह आतल्या सर्किटपर्यंत पोहोचणार नाही. आणि बरंचसं नुकसान टळेल. 

तुमच्या गॅजेटचे भाग सुटे होत असतील तर आधी ते सुटे करुन घ्या. मेमरी कार्ड सिम कार्ड मागचं पॅनेल इ. आता हे सुटे भाग सुक्या स्वच्छ आणि मऊ कपड्यावर मोकळ्या जागेत ठेवा. 

गॅजेटच्यावरचं पाणी तर साफ केलं पण आतल्या पाण्याचं काय तुमचा मोबाइल किंवा कॅमेरा उलटा करुन जोरात हलवा. त्यातील जास्तीतजास्त पाणी बाहेर काढायचा प्रयत्न करा. पण इतकाही जोरात नव्हे की तो खाली पडून त्याला आणखीनच इजा होईल. 

यानंतर टॉवेल टिश्यू किंवा वर्तमानपत्राचा कागद घेऊन तुमचं गॅजेट काळजीपूर्वक पुसून घ्या. त्यावेळी गॅजेटच्या आतल्या खुल्या सर्किट बोर्डला अपाय होणार नाही याची काळजी घ्या.. 

एखादी वस्तू पाण्यात पडल्यावर किंवा भिजल्यावर आपण ड्रायर किंवा ब्लोअरचा वापर करतो. पण गॅजेटच्या बाबतीत असं अजिबात करु नका. गरम हवा गॅजेटसाठी चांगली नसते. त्याऐवजी घरात एसी असेल तर त्याच्या थंड हवे समोर थोड्या मिनिटांसाठी आपलं गॅजेट ठेवा. 

याहूनही वेगळी अशी एक ट्रिक म्हणजे चक्क तांदूळांचा वापर करा. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण तांदळात गॅजेट पुरून ठेवा. एका भांड्यात स्वच्छ निवडलेले तांदूळ घ्या. तुमचं गॅजेट त्या तांदूळात पुरुन ठेवा. भांड्यावर झाकण लावून बंद करा. या ट्रिकने पूर्ण भिजलेल्या मोबाईलला कोरडं होण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. पण तुमच्या गॅजेटची परिस्थिती याहून वाइट असेल तर मात्र ते जास्तवेळ आत ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतो. 

तांदळामधून बाहेर काढताच लगेचच मोबाइल चालू करण्याची घाई करु नका. तुमच्याकडे अल्कोहोल स्पिरीट असेल तर कापसाचा बोळा त्यात बुडवून आतल्या circuit वर फिरवून घ्या. यामुळे अतिरिक्त पाण्याचं बाष्पीभवन होईल व गॅजेट लवकरात लवकर कोरडं होईल. अल्कोहोल स्पिरीट नसल्यास गॅजेटचे सर्व भाग स्वच्छ मऊ कपड्याने पुसून घ्या.. 

सरतेशेवटी गॅजेट संपूर्णतः कोरडं झाल्याची खात्री झाली की सर्व भाग पुन्हा व्यवस्थित जोडा व थोड्यावेळाने गॅजेट स्विच ऑन करा.


आला पावसाळा गॅजेट सांभाळा आला पावसाळा गॅजेट सांभाळा Reviewed by Sooraj Bagal on October 07, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.