वापरा, गुंडाळा, घेऊन जा... टॅब्लेट

plastic-logic-papertab-thin-tablet-3'पेपर टॅब'च्या रूपाने लंडनमध्ये तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार

वृत्तसंस्था, लंडन

गॅजेटच्या वापराचा ट्रेंड सध्या स्मार्टफोनकडून टॅबकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर टॅब्लेटच्या क्षेत्रात सध्या दररोज नवनवे संशोधन होत आहे. कॅनडातील शास्त्रज्ञांनी त्यात एका क्रांतिकारी संशोधनाची भर घातली आहे. अगदी कागदाच्या जाडीचा आणि सहजपणे गुंडाळून कुठेही नेता येण्याजोगा टॅब्लेट या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. येत्या पाच वर्षांत कदाचित तो तुमच्या 'पीसी'ची जागा घेऊ शकेल.

कॅनडातील क्वीन्स युनिव्हर्सिटीने प्लॅस्टिक लॉजिक आणि इंटेल लॅब्ज यांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. या संशोधनातून 'अनब्रेकेबल' अशा क्रांतिकारी गॅजेट्सचा जन्म होणार आहे.

पेपर टॅबला लवचिक, हाय रिझॉल्यूशनचा १०.७ इंची प्लॅस्टिक डिस्प्ले आणि टचस्क्रीन आहे. इंटेल कोअर आय फाइव्ह या दुसऱ्या पिढीतील प्रोसेसरवर या टॅबचे काम चालते. 'या डिस्प्लेच्या माध्यमातून टॅबशी इंटरॅक्शन सुलभ होते. आजच्या घडीला काचेचे डिस्प्ले आहेत. त्या तुलनेत प्लॅस्टिकचे डिस्प्ले अधिक हलके, बारीक आणि वापरायला सुलभ आहेत,' असे 'प्लॅस्टिक लॉजिक'चे सीईओ इंद्रो मुखर्जी यांनी सांगितले.

येत्या आठवड्यात लास व्हेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो होणार आहे. त्यावेळी या पेपर टॅबचे सादरीकरण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

सध्याच्या पारंपरिक डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये एका स्क्रीनवर विंडोज वापरले जाते. त्याऐवजी प्रत्येक अॅप्लिकेशनसाठी स्वतंत्र कागद (पेपर शीट) वापरण्याची संकल्पना असलेल्या डेस्कटॉपची कल्पना या संशोधकांनी मांडली आहे. त्यामुळे एकाच स्क्रीनऐवजी दहा किंवा अधिक इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले किंवा पेपर टॅब वापरता येऊ शकतात. त्यांचा ई-बुक म्हणूनही वापर करता येऊ शकतो, ज्यात वाचणाऱ्यांना फक्त स्क्रीन वाकवून पाने उलटता येऊ शकतात. अनेक पेपर टॅब वापरणे हे अधिक सोपे असल्याचे मत क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या ह्युमन मीडिया लॅबचे संचालक रोएल व्हर्टेगाल यांनी सांगितले.

'येत्या पाच-दहा वर्षांत कम्प्युटर्स, अल्ट्रा नोटबुक्स, टॅब्लेट्सऐवजी अशा रंगीत प्रिंटेड कागदांचा (पेपर टॅब) वापर सुरू होईल,' असा दावा इंटेलचे शास्त्रज्ञ रायन ब्रॉटमन यांनी केला आहे. तसेच कागदांचा वापरही मर्यादित होणार असल्यामुळे कागदांच्या गठ्ठ्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.

वापरा, गुंडाळा, घेऊन जा... टॅब्लेट वापरा, गुंडाळा, घेऊन जा... टॅब्लेट Reviewed by Sooraj Bagal on January 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.