भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अ‍ॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अ‍ॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20 हजार अ‍ॅप्समध्ये बहुतांश अ‍ॅप्स हे भारतीय विकासकांनी प्रकाशित केले असल्याचे नोकिया इंडियाने जुलै ते डिसेंबर (2012) या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या ‘नोकिया मोबीसाइट’ या सर्वेक्षणात म्हटले आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत तब्बल 1 हजार 270 कोटी वेब पेजेस बघितल्याचेही दिसून आले आहे.


देशातील जनता मोबाइल इंटरनेटचा कशा प्रकारे वापर करते याचा मागोवा घेणारा द्वैवार्षिक अहवाल   नोकिया इंडियाने प्रसिद्ध केला आहे. नोकिया मोबीसाइटद्वारे मोबाइल इंटरनेट उपयोगकर्त्यांच्या वर्तणुकीचे दर्शनही झाले आहे. या वापरकर्त्यांकडून कोणत्या प्रकारचे गेम्स, अ‍ॅप्स, संगीत आणि इतर गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाते याची माहिती मिळते. एकीकडे या संगीत, गेमिंग आणि सोशल नेटर्वकिंगची प्रचंड आवड असली तरी ऑनलाइन आणि मोबाइल अस्तित्वाबद्दल त्यांना गुप्तताही पाळायची असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून आले आहे. त्यामुळे लॉक्स ऑन गॅलरी, लॉक ऑन मेसेजिंग, लॉक ऑन अ‍ॅप्स, कॉल रेकॉर्डर हे अ‍ॅप्स जास्त डाऊनलोड झाल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.  

शाळा, कॉलेज आणि ऑफिसवरून परतल्यावर इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नोकिया ब्राउजरवरच्या पीक-अवर वेळा या संध्याकाळी 7.30 ते रात्री 10.30 दरम्यान आहेत. नोकिया ब्राउजर वापरणारे सर्वाधिक क्रियाशील युजर्स उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात आहेत. दक्षिण भारतीय मंडळी येत-जात असताना इंटरनेटचा वापर सर्वाधिक करतात. इंटरनेट वापरानुसारच्या टॉप 10 यादीत या तिन्ही राज्यांचा समावेश असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.  
मोबाइलवर ‘व्हिडिओ’ पाहण्यास पसंती  
फेसबुकचे वेड वाढतच असून गुगलवर सर्च करण्यापेक्षा लोक फेसबुकवर अधिक जातात. येता-जाताना मोबाइलवर व्हिडिओज पाहण्यालाही अधिक पसंती देण्यात आली आहे. नोकिया ब्राउजरवर सर्वाधिक पाहिल्या जाणार्‍या टॉप 10 साइट्सच्या यादीत यूट्यूब, ट्युबिडी आणि व्ह्यूक्लिप यांचा समावेश आहे.  

तरुण पिढी प्रायव्हसीबद्दल आग्रही  
तरुण पिढी कधी नव्हे इतकी ‘सोशल’ बनली असली तरी आपल्या प्रायव्हसीबद्दलही तितकीच आग्रही असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या सर्वेक्षणादरम्यानच्या काळात नोकिया स्टोअरमधून इतर कोणत्याही सेवेपेक्षा प्रायव्हसीसंदर्भातले अ‍ॅप्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले. सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या पाच अ‍ॅप्सच्या यादीत ‘फोन सिक्युरिटी अ‍ॅप’चा चौथा क्रमांक लागतो.


भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर Reviewed by Sooraj Bagal on March 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.