ओबामा त्यांचा ब्लॅकबेरी फोन वापरताना |
'अॅपल' ही जगभरातील श्रीमंतांची आणि 'टेक फ्रेंडली' लोकांची आवडती कंपनी. बडेबडे लोकही आयफोन पसंत करतात. खुद्द ओबामा यांचीही आयफोन वापरण्याची इच्छा होती. मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षपदामुळे तो वापरता येत नसल्याची खंत त्यांनी मागे व्यक्त केली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते 'पर्सनल ब्लॅकबेरी' वापरत. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना विशिष्ट पद्धतीने तयार केलेला, अतिसुरक्षित ब्लॅकबेरी देण्यात आला. आता त्यांच्या ब्लॅकबेरीला पर्याय म्हणून सॅमसंग आणि एलजीच्या अँड्रॉइड फोनची चाचपणी सुरू असल्याचे 'व्हाइट हाऊस'च्या दूरसंचार विभागाच्या हवाल्याने सांगण्यात येते आहे. प्राथमिक टप्प्यात या चाचण्या होत्या तरी अवघ्या काही महिन्यांत ओबामा ब्लॅकबेरीकडून अँड्रॉइड आधारित सॅमसंग किंवा एलजीकडे वळू शकतात, इथपर्यंत विश्वास त्यात व्यक्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यात आयफोन कुठेही नव्हता.
'ब्लॅकबेरी' सध्या जगभरात वाईट काळातून जाते आहे. उत्तर अमेरिकेत तर सध्या ब्लॅकबेरीचे एक टक्काही युझर शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत 'व्हाइट हाऊस'सारखा मोठा आणि प्रतिष्ठित ग्राहक गमावणे कंपनीला परवडणारे नाही. गेल्या दशकभराहून अधिक काळ व्हाइट हाऊससोबत कार्यरत असून ब्लॅकबेरी इतकी सुरक्षित सिस्टम इतर कोणाची नसल्याचा कंपनीचा दावा आहे. अशा चाचण्या सातत्याने घेतल्या जातात. मात्र, एलजी आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांना 'ब्लॅकबेरी'च्या बरोबरीत येण्यास अजून खूप वेळ असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यातच ब्लॅकबेरीला तात्पुरता दिलासा देताना व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्ने यांनी स्पष्ट केले आहे की, दुसऱ्या मोबाइलच्या कुठल्याची प्रकारच्या चाचण्या सुरू नाहीत. अर्थातच, व्हाऊस हाऊसच्या अधिकृत प्रवक्त्याकडून ही प्रतिक्रिया अपेक्षितच होती.
मात्र, बदलते तंत्रज्ञान पाहता दशकभरापासून एकच तंत्रज्ञान वापरणे व्हाइट हाऊसलाही आवडले नसणार. त्यामुळे अधिकृत कबुली आली नसली आणि सुरक्षेच्या दृष्टीने तसे सांगणे योग्य नसले तरी लवकरच त्यात बदल होणार नाही, हे कुणीही छातीठोक सांगायला तयार नाही. त्यामुळे २०१७मध्ये अमेरिकेला नवीन अध्यक्ष मिळाल्यावर त्याच्याकडेही ब्लॅकबेरीच असेल की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ओबामांचा ब्लॅकबेरीला टाटा?
Reviewed by Sooraj Bagal
on
March 26, 2014
Rating:
No comments: