फ्री कॉलिंगला वाढती पसंती

free-callingस्वस्त कॉलिंगचा मोसम सरल्यानंतर आता टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा त्यानंतर झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव ३ जी यासारख्या बाबींमुळे मोबाइलचे कॉलरेट पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे स्वस्तात (काहींना तर फुकटात!) कॉल करण्याची सवय लागलेल्यांना आपले बजेट जुळवणे कठीण होते आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आता इंटरनेट बेस्ड फ्री कॉलिंगची सुविधा देऊ केली आहे. 

त्यामुळे विबर स्काइप ,निंबुझ फ्रिंग टँगो आणि काकाओ टॉक यांसारख्या मोबाइल अॅप्लिकेशन्सने मोबाइल डेटा व वायफायच्या आधारे देऊ केलेल्या फ्री कॉलिंगच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ब्लॅकबेरीनेही नुकतीच त्यांची मेसेंजर सर्विस अपग्रेड केली असून त्यात बीबीएम व्हॉइस हे फीचर अॅड केले आहे. त्याआधारे वाय-फायचा वापर करून जगातील कोणत्याही व्यक्तीला मोफत कॉल करता येतो. लवकरच ही सुविधा भारतात उपलब्ध होणार आहे. 

निंबुझने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या डिसेंबरपर्यंत भारतात निंबुझ ते निंबुझ असे तब्बल एक अब्ज ६८ कोटी मिनिटांचे कॉल केले. २०११ मधील ५१ कोटी मिनिटांच्या तुलनेत हा आकडा तिप्पट झाला आहे. फ्री कॉलिंगची सुविधा देणाऱ्या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद वाढत असला तरी त्यामुळे व्यवसायावर काही परिणाम झाला किंवा नाही याबाबत टेलिकॉम कंपन्या बोलण्यास तयार नाहीत. मात्र दूरसंचार क्षेत्रातील जाणकार हे मान्य करतात. स्काइप किंवा विबरसारख्या अॅपमुळे इंटरनॅशनल कॉल करणाऱ्यांचा खूप फायदा होतो. तसेच विविध राज्यात प्रवास करणाऱ्यांनाही रोमिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत. त्यामुळे या सुविधांना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे असे जाणकार सांगतात. प्रामुख्याने अँड्रॉइड डिव्हाइसच्या वाढत्या वापरामुळे अॅप टू अॅप फ्री कॉलिंग वाढले आहे. प्रामुख्याने कॉलेजला जाणारे विद्यार्थी व तरुण व्यावसायिकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यातच नॅशनल टेलिकॉम पॉलिसीमध्ये इंटरनेटवर आधारित व्हॉइस कॉल्सची परवानगी देण्यात आल्याने फ्री कॉलिंगच्या सुविधेला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे. 

अगदी दूरसंचार मंत्री कपिल सिबल यांनीही मोबाइल कंपन्यांना त्यांचे बिझनेस मॉडेल बदलून व्हॉइस कॉलिंगची सुविधा मोफत देत डेटा वापरासाठी शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. आजकाल विविध कार्यालये ,बीपीओ आणि मॉल्समध्ये वायफाय सुविधा घेण्याचे प्रमाण वाढते आहे. निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी देशात जवळपास २० हजार वायफाय हॉटस्पॉट असल्याचा अंदाज आहे. 

फ्री कॉलिंगला वाढती पसंती फ्री कॉलिंगला वाढती पसंती Reviewed by Sooraj Bagal on February 26, 2013 Rating: 5
Powered by Blogger.